भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र आता ओडिशा सरकारसमोर मृतदेहांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आहे. काही मृतदेह बेवारस पडलेले असताना, दोन वेगवेगळ्या कुटुंबांनी एकाच मृतदेहावर दावा केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहाची स्थिती खराब असल्याने कुटुंबीयांना त्यांना ओळखणे कठीण जात आहे.
दिल्लीहून विशेष टीम ओडिशात दाखल : मिळालेल्या माहितीनुसार, एम्स भुवनेश्वरच्या शवागारात 124 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. तर इतर 70 मृतदेह राजधानी हॉस्पिटल, सम हॉस्पिटल, आमरी हॉस्पिटल, केआयएमएस हॉस्पिटल आणि भुवनेश्वरमधील हाय-टेक हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. त्याच वेळी, आज एक विशेष टीम दिल्लीहून ओडिशात आली आहे, जी आणखी काही दिवस या मृतदेहांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हेल्प डेस्कद्वारे ओडिशा सरकारकडून सर्व मदत दिली जात आहे.
नातेवाइकांची राहण्याची व्यवस्था केली आहे : विशेष टीमने सांगितले की, 'आम्ही नातेवाईकांना मृतदेहांची छायाचित्रे आणि विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची यादी दाखवत आहोत. एखाद्याला आपल्या प्रिय व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजल्यास, आम्ही त्याला/तिला संबंधित रुग्णालयात घेऊन जातो. त्यांनी कोणाला ओळखले तर आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करतो. याशिवाय पीडितांच्या नातेवाइकांची राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.'