भुवनेश्वर -भारतीय हवामान विभागाने पश्चिम बंगालच्या उपसागरावरून चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर ओडिसा सरकारने सात जिल्ह्यांत सावधानतेचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ ओरिसाच्या दक्षिण भागात आणि शेजारील आंध्रप्रदेशमध्ये धडकू शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. विशेष दक्षता आयुक्त पी. के. जेना यांनी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. ओडिसा आपत्ती निवारण दलाच्या 42 स्क्वाड (ODRAF) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) 24 स्क्वाड हे सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहे. गजापती, गंजाम, रायगाडा, कोरापुत, मलकनगिरी, नाबरनगपूर, कंधमाल या सात जिल्ह्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
हेही वाचा-गुजरातमध्ये राजकीय भूकंप... कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये करणार पक्षप्रवेश
प्रशासनाकडून विविध उपाययोजना-
गंजाम जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार आहे. 15 बचाव पथके गंजाममध्ये तैनात केल्याचे जेना यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर 11 अग्नीशमन दलाचे पथक, ओडिसाच्या आपत्कालीन सुरक्षा दलाचे सहा पथके आणि एनडीआरएफ हे आपत्कालीन परिस्थितीत तयार असणार आहे. गजपती आणि कोरापुत जिल्हा प्रशासनाने रविवारी आणि 25 सप्टेंबरची सुट्टी रद्द केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगलाच्या उपसागरामधील केंद्र आणि उत्तर भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे चक्रीवादळ तयार होणार आहे.