नवी दिल्ली - पेगासस हे स्पायवेअर ( Pegasus Spyware ) भारताने 2017 मध्ये इस्रायलकडून संरक्षण करारात खरेदी केल्याचा धक्कादायक गोप्यस्फोट झाला आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या ( New York Times Report on Pegasus ) रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात 2017 मध्ये सुमारे २ अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र करार झाला होता. या करारात पेगसेस स्पायवेअर हे केंद्रस्थानी होते, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2017 मधील इस्रायल भेटीचाही संबंध असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ( PM Narendra Modi in Israel ) होते. तर या भेटीनंतर इस्रायल पंतप्रधान बिन्यामिन नेत्यान्याहूदेखील जून 2019 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्रायलच्या बाजूने मतदान केले होते.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तावर सरकारची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न वृत्तसंस्था पीटीआयकडून करण्यात आला होता. परंतु अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जुलै 2021 मध्ये, आंतरराष्ट्रीय मीडिया संस्था (international media organization) ने खुलासा केला होता, की इस्रायल स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून भारताचे दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन नेते व एक न्यायाधीशासह 300 लोकांची हेरगिरी केले गेली आहे. पेगासस स्पायवेअर निर्माण करणारी कंपनी एनएसओ ( NSO Group ) इस्रायलमधील आहे.
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या स्पायवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली होती. व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात एनएसओ (NSO Group ) या कंपनीला कोर्टात खेचल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधलं गेलं आहे. इस्रायलच्या NSO Group या इस्त्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीने पेगासस स्पायवेअरची निर्मिती केली आहे. या स्पायवेअरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपची यंत्रणा भेदून पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचे व्हॉट्सअपनं जाहीर केले. NSO या कंपनीनं मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले होते.
काय आहे पेगासस स्पायवेअर ?
पेगासस एक पावरफुल स्पायवेअर आहे. जे मोबाइल आणि कॉम्प्युटरमधून गोपनीय व वैयक्तिक माहिती चोरून हॅकर्सला पुरवते. हे स्पायवेअर तुमच्या फोनच्या माध्यमातून तुमची हेरगिरी करते. याच्या माध्यमातून आयओएस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असणारे फोन हॅक केले जाऊ शकतात. त्यानंतर फोनचा डेटा, ई-मेल, कॅमेरा, कॉल रेकॉर्ड आणि फोटोसह प्रत्येक अॅक्टिव्हीटीला ट्रेस केले जाते.