नवी दिल्ली : हरियाणातील मेवातमधील नूह येथून सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराचे लोण सोहना आणि गुरुग्रामपर्यंत पसरले आहे. नूहशिवाय सोहना आणि गुरुग्राममध्येदेखील हिंसाचारामुळे तणावाची स्थिती आहे. दिल्ली पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. नूह येथील हिंसाचारानंतर निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नूह पोलिसांनी 21 एफआयआर नोंदविले आहेत. केंद्र सरकारने हरियाणामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सच्या २० कंपन्या पाठविल्या आहेत. यामध्ये सीआरपीएफचे 4, आरएएफचे 12, आयटीबीपीचे दोन आणि बीएसएफचे दोन असा समावेश आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी नूह हिंसाचार संदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांसह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नूहमधील परिस्थिती नियंत्रणात असून पाच जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नूहचे एसपी नरेंद्र सिंह म्हणाले की, मोनू मानेसर हे नूह मिरवणुकीत सहभागी नव्हता. त्याचे नाव कोणत्याही एफआयआरमध्ये नाही. पुढील काही दिवस नूहमध्ये इंटरनेट सेवा आणि कलम 144 लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शांतता प्रस्थापित झाल्यावरच इंटरनेट बंदी उठवली जाईल. हिंसाचारामुळे आतापर्यंत 60 जण जखमी झाल्याची त्यांनी दिली आहे.
नूह येथील हिंसाचारानंतर 8 निमलष्करी बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. हिंसाचारानंतर मंदिरांमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे. 1 आणि 2 ऑगस्ट रोजी, हरियाणा शालेय शिक्षण मंडळाच्या 10वीच्या पुरवणी आणि DLED परीक्षा राज्यात घेण्यात येणार होत्या. संपूर्ण हरियाणामध्ये या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोन्ही परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील, असे बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.
दिल्ली पोलीस हाय अलर्टवर-गुरुग्राम आणि फरिदाबादच्या सीमेसह काही समाजकंटक दिल्लीतील शांतता भंग करणार असल्याची पोलिसांना शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. दिल्ली पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. नूहमध्ये झालेल्या गोंधळानंतर दिल्ली पोलिसांकडून मोठी काळजी घेण्यात येत आहे. सर्व वरिष्ठ अधिकार्यांना त्यांच्या परिसरात गस्त घालण्याचे व लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाल्यानंतर नूह येथे तणावपूर्ण शांतता आहे.