नवी दिल्ली : दिल्लीतील नव्या संसद भवनाचे म्हणजेच सेन्ट्रल व्हिस्टाचे 28 तारखेला उद्घाटन केले जाणार आहे. हा उद्घाटन सोहळा भव्य केला जाणार आहे, मात्र उद्धाटनावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. नव्या संसद भवनाची खरच गरज होती, असा प्रश्न करत राष्ट्रपती मुर्म यांना उद्धाटन कार्यक्रमात का बोलवण्यात आले नाही, यावरुन संजय राऊत यांनी मोदी सरकारवर ताशोरे ओढले आहेत. ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार : देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या द्रौपदी मुर्म यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमातून आमंत्रित करण्यात आले नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राष्ट्रपती यांना डावलले जात असल्याने काँग्रेसहित सर्व विरोधी पक्ष हे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले, हे पंतप्रधान मोदी वारंवार सांगतात, मग त्यांना राष्ट्रपती महिलेची आठवण संसदेच्या उद्घाटनावेळी का झाली नाही? राष्ट्रपती आदिवासी आहेत, म्हणून त्यांना डावलले जात आहे. त्यामुळे आम्ही सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेतला आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. राष्ट्रपती मुर्म या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख आहेत. न्यायव्यवस्थेच्या प्रमुख आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे एका कार्यक्रमाला जाऊ शकतात, तरीही राष्ट्रपतींना बोलवण्यात आले नाही.