नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे लोकसभेतील अध्यक्ष अधीररंजन चौधरी यांना पत्र लिहीत याबाबतची माहिती दिली. यासोबतच, अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २०२१च्या जानेवारीमध्ये होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना ३ डिसेंबरला एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलन, कोरोना लसीची तयारी, चीन सीमावाद, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी असे काही मुद्दे हिवाळी अधिवेशनात घेता येतील असे लिहिले होते.
इतर नेत्यांचीही अधिवेशन रद्द करण्याची मागणी..
जोशी यांनी याच पत्राचा आधार घेत, चौधरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले की हिवाळ्यामध्ये साथीचे रोग वेगाने पसरतात त्यामुळे या महिन्यांमध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः दिल्लीमध्ये याचा धोका अधिक आहे. सध्या डिसेंबर महिना सुरू आहे, आणि काही दिवसांमध्येच कोरोनावरील लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत मी विविध पक्षांच्या इतर नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामध्ये या सर्वांनीच खबरदारी म्हणून हिवाळी अधिवेशन रद्द करण्याबाबत बोलल्याचे जोशी म्हणाले.
सरकार पुढील अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे जानेवारी २०२१मध्येच घेणे ठीक राहील असेही जोशी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच संसदेचे पावसाळी अधिवेशनही उशीरा झाले होते. या अधिवेशनात २७ विधेयके पारित झाली, असेही जोशींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा :कर्नाटक विधानपरिषदेत हाणामारी; गोरक्षा विधेयकावरुन काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली