नवी दिल्ली : पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हेरगिरीचे सॉप्टवेअर विकणाऱ्या एनएसओ ग्रुपसोबत कसलाही आर्थिक व्यवहार केला नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत दिले. त्यामुळे आता यावर विरोधकांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
एनएसओसोबत कसलाही व्यवहार नाही
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत ही माहिती दिली. एनएसओ ग्रुप टेक्नोलॉजीससोबत संरक्षण मंत्रालयाने कसलेही आर्थिक व्यवहार केले नाही असे भट यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले. एनएसओ ग्रुप टेक्नोलॉजीससोबत सरकारने काही व्यवहार केले आहेत का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
पेगासस एनएसओ ग्रुपचेच
एनएसओ ग्रुप टेक्नोलॉजीस ही इस्रायली सॉफ्टवेअर कंपनी आहे. हेरगिरीशी निगडीत पेगासस सॉफ्टवेअर याच कंपनीचे आहे. पेगाससच्या माध्यमातून देशातील नेते आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यात आल्याचे आरोप झाल्यामुळे या कंपनीवरही टीका होत असल्याचे दिसून आले होते.
पेगाससवरून संसदेत गदारोळ
पेगाससवर संसदेत चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. यावरून संसदेत मोठा गदारोळ बघायला मिळत आहे. पेगाससच्या मुद्द्यावर आधी चर्चा केली पाहिजे अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरत सोमवारीही सदनात गदारोळ घातला. त्यामुळे अनेकदा सदनाचे कामकाज तहकूब करावे लागले. सभापतींच्या आसनासमोर जाऊन विरोधकांनी घोषणाबाजी केल्याचेही चित्र यावेळी लोकसभेत बघायला मिळाले.
हेही वाचा -अरे काय, डोसा बनवताय का? 10 मिनिटांत तीन विधेयके मंजूर केल्यावरून विरोधकांचा सवाल