श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. जम्मू-काश्मीर सरकारने दगडफेक करणाऱ्यांवर आणि देशविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांवर कारवाई करण्यासाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. ज्याअंतर्गत अशा लोकांना ना सरकारी नोकरी दिली जाईल आणि ना त्यांना पासपोर्ट मिळू शकेल. दगडफेक, राज्य आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांना यापुढे परदेशात जाण्याची संधी मिळणार नाही.
राज्यातील कोणतीही व्यक्तीला दगडफेक करताना पकडले गेले. तर त्या व्यक्तीला पासपोर्ट मिळणार नाही. तसेच असे लोक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्जही करू शकणार नाहीत. यासंदर्भात काश्मीर सीआयडीच्या विशेष शाखेने सर्व सुरक्षा युनिटना आदेश जारी केले आहेत. एखाद्या व्यक्तीचा सुरक्षा मंजुरीचा अहवाल तयार करताना, संबंधित व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या दगडफेकीत, राज्याच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या कारवायात सहभागी नसल्याचे सुनिश्चि करावे. यासाठी सर्व डिजिटल पुरावे (व्हिडिओ किंवा फोटो) आणि पोलीस रेकॉर्ड विचारात घेतले जातील.