नवी दिल्ली - भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेननं ओलिस ठेवल्याची माहिती समोर आली होती. यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेननं ओलिस ठेवल्याचे वृत्त ( No Report Of Students Taken Hostage In Ukraine ) ही निव्वळ अफवा असल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास हे तिथल्या भारतीय नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. युक्रेन प्रशासनाच्या सहकार्याने अनेक जण खारकीव्हमधून बाहेर पडले आहेत. युक्रेनने विद्यार्थ्यांना ओलिस ठेवल्याविषयीची कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे मंत्रालयाने ( MEA On Claims Of Indian Students Being Held Hostage ) सांगितले.
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सुरक्षा दलांनी ओलिस ठेवले असून त्यांचा ढाल म्हणून वापर केला जात आहे, असा दावा भारतातील रशियन दूतावासाने बुधवारी केला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा दावा रशियाने केला होता. युक्रेन सोडून बेल्गोरोडला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मोठ्या गटाला खारकोव्हमध्ये जबरदस्तीने युक्रेनियन अधिकाऱ्यांनी अडवल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते. रशियन सशस्त्र दल भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.