कृष्णागिरी :सुटीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा डीएमकेच्या नगरसेवकाने बोचमपल्ली येथे खून केल्याने खळबळ उडाली होती. प्रभू असे त्या खून झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे. या खुनामागे राजकारण असल्याची चर्चा होती. मात्र या खुनामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे कृष्णागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सरोज कुमार ठाकूर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली असून, माजी सैनिक याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
लष्करी जवान आणि खुनी नगरसेवक नातेवाईक :डिएमकेच्या नगरसेवकाने लष्करी जवानाचा खून केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक सरोजकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला. यावेळी त्यांनी जवानाचा खून होणे दुर्दैवी आहे. या घटनेत मारेकरी आणि लष्करी जवान हे दोघेही जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या खुनामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासह त्यांनी 8 फेब्रुवारीला नळाच्या पाण्यावरुन या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यातून ही घटना घडल्याची माहिती दिली. डिएमके नगरसेवक चिन्नास्वामी आणि त्यांच्या नातेवाईकांनी लष्करी जवान प्रभुवर हल्ला केला. यात 14 फेब्रुवारीला प्रभू यांचे निधन झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी 9 आरोपींच्या आवळल्या मुसक्या :लष्करी जवान प्रभु यांच्यावर डिएमके नगरसेवक चिन्नास्वामी याने हल्ला केल्यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली. मात्र हे प्रकरण प्रभू आणि चिन्नास्वामी यांच्यामध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरुन वाद झाला. त्यातच चिन्नास्वामीने लष्करी जवान प्रभूवर आपल्या नातेवाईकांसह हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रभूचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलीस घटनेंवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सरोजकुमार ठाकूर यांनी दिली आहे.