पणजी -गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा असल्यामुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची कबुली गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी उच्च न्ययालयासमोर दिली आहे. यानंतर यापुढे ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावता कामा नये’, असा आदेश न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे. ही सुनावणी बुधवारी ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. याशिवाय गोव्यात 9, 10 आणि 11 मे या तीन दिवसांतच 103 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
या सुनावणीला राज्याचे आरोग्य सचिव रवी धवन, प्रिन्सीपल वित्त सचिव पुनित कुमार गोयल, नगरविकास सचिव डॉ. तारिक थॉमस, गोवा मेडिकल कॉलेजचे नोडल ऑफिसर डॉ. विराज खांडेपारकर उपस्थित होते. डीन डॉ. शिवानंद बांदेकर अनुपस्थितीत असल्याचे आढळताच न्यापीठाने चौकशी केली आणि तत्काळ त्यांच्या उपस्थितीचा आदेश दिला. सरकारच्यावतीने अॅड. जनरल देविदास पांगम यांच्यासोबत अतिरिक्त सरकारी वकील दीप शिरोडकर उपस्थित होते. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मेसर्स स्कूप इंडस्ट्रिज प्रा. लि. या आस्थापनाच्यावतीने अॅड. विवेक रॉड्रिग्स तर केंद्र सरकारच्यावतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रविण फळदेसाई आणि रविराज चोडणकर उपस्थित होते.
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही
मुंबई उच्च न्यायालयासमोर कोविड संदर्भात कोविड सर्व्हिसीस गोवा या संस्थेच्या वतीने दिशा नायक सरदेसाई व सिद्धार्थ सरदेसाई यांनी याचिका सादर केली. संपूर्ण गोव्यातील रुग्णालयांसाठी रोज सुमारे 55 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा लागतो. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सर्वात अधिक मागणी आहे, पण तेवढा पुरवठा होत नाही याची कबुली डॉक्टर आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी न्यायपीठापुढे दिली. सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी 20 हजार लिटर ऑक्सिजन पुरवठा करणारी टाकी आहे. पण त्यातून गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करता येत नाही. गोमेकॉसाठी दिवसाला 72 ट्रॉली ऑक्सिजन सिलिंडर लागतात. पण तेवढा पुरवठा होत नसल्याने 1.5 क्युबिक मिटर व 7 क्युबिक मिटरचे सिलिंडर वापरले जातात. पण हा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची माहिती उच्च न्यायालयासमोर उघड करण्यात आली.
रोज रुग्ण का मरतात ? न्यायालयासमोर आले खरे कारण
जे रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत व ज्यांना व्हेंटिलेटर मिळाले नाहीत, त्यांना हाय फ्लो नेझल ऑक्सिजन एचएफएनओ उपकरणाद्वारे दिले जाऊ शकते. अशी शेकडो यंत्रे गोमेकॉत पडून आहेत. ही यंत्रे खूप ऑक्सिजन वापरतात म्हणून त्याचा वापर केला जात नाही, अशी कबुली गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यावर रोज 50 पेक्षा रुग्ण का मरण पावतात हे स्पष्ट झाले. रोज गोमेकॉत 1 हजार पेक्षा जास्त सिलिंडर लागत असले तरी किमान 400 सिलिंडरचा तुटवडा भासतो, अशी माहिती उघड होताच रिकामी सिलिंडर नसल्यामुळे व सिलिंडर नेण्यासाठी वाहने नसल्यामुळे अडथळा होतो, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी एनजीओ मार्फत गोव्याबाहेरून रिकामी ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची तयारी दर्शविली. तेव्हा रिकामी सिलिंडर आले तरी ते भरण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन साठा नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.