नवी दिल्ली - 'भारतीय लष्कराचा संयम पाहण्याची घोडचूक कोणीही करू नका. चर्चा आणि राजकीय मार्गाने सीमावाद सोडवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. एकतर्फी सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारताने सडेतोड उत्तर दिलं असून गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणाले. राजधानी दिल्लीत लष्कर स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असून सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करत असल्याचेही ते म्हणाले.
सीमावाद शांततेत सोडवण्यासाठी भारत कटीबद्ध -
मागील दहा महिन्यांपासून भारत-चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी आपल्या संबोधनातून चीनला कठोर शब्दात उत्तर दिले. भारत शांततेने आणि चर्चेच्या मार्गाने सीमावाद सोडवण्यास कटीबद्ध असून लष्कराचा संयम पाहण्याची घोडचूक कोणीही करू नये असे म्हणत चीनला इशारा दिला. लष्कर स्थापना दिनानिमित्त दिल्लीतील जनरल करिअप्पा मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लष्करी कवायती करत जवानांनी कौशल्य दाखवले. तसेच परडेही केली.