नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.
आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
लोकांनी त्यांना धडा शिकवावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की ऑक्सिजनची कमतरता असल्याने अनेक रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करण्यास नकार दिला होता. हे सर्वांना माहित आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नाही, याचा अर्थ त्यांनी पाहिले नाही अथवा ऐकले नाही. लोकांनी त्यांना धडा शिकवावा, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.