पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत निवेदन नवी दिल्ली - विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. विरोधकांकडे बहुमत नसतानाही दाखल करण्यात आलेल्या या अविश्वास प्रस्तावावरुन भाजपाने विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल केला होता. यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात अविश्वास ठरावावर सविस्तरपणे निवेदन दिले आहे. त्यानंतरच सभागृहाने आवाजी मतदान घेऊन अविश्वास ठराव नामंजूर केला आहे.
अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान झाले आणि हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्तावही सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला आहे. चौधरी यांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान करताना पंतप्रधान मोदींची तुलना नीरव मोदीशी केली होती.
आज मी सभागृहात काही गुपिते सांगू इच्छितो. माझा विश्वास बसला आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळाले आहे. हे लोक ज्याचे वाईट चिंततील आहेत, त्याचे चांगलेच होत आहे. एक उदाहरण तर तुमच्यासमोर उभे आहे. २० वर्षं झाली, काय केले नाही. पण माझे भलेच होत गेले. त्यामुळे विरोधकांना हे गुप्त वरदान आहे - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन का? - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचे गुरुवारी लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी विशेषाधिकार समिती चौकशी करणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रस्ताव मांडताना म्हटले की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी प्रत्येक वेळी देश आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्यावेळी त्यांच्याकडून माफीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी माफी मागितली नाही. त्यांच्याविरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींबाबत वक्तव्य करत म्हटले होते की, धृतराष्ट्र आंधळा होता, आजही राजा आंधळाच आहे. मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधी दिली नाही.
विरोधकांवर जनतेचा अविश्वास - विरोधकांनी गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधीही अविश्वास प्रस्ताव आणला होता, पण, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांवर अविश्वास दाखवला आणि भाजप-एनडीए अधिक जागा घेऊन सत्तेत आले. त्यामुळे यावेळीही हा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आम्ही नव्या विक्रमासह निवडून येणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हा सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव नसून विरोधकांची परीक्षा आहे, असेही ते म्हणाले.
अधीर रंजन यांना टोला - अविश्वास प्रस्तावासाठी पाच वर्षे दिले तरी विरोधकांनी पूर्ण तयारी केली नाही. याआधी अटल बिहारी यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावेळी शरद पवार यांनी भाषण केले होते. त्यानंतर 2004 मध्ये अविश्वास प्रस्तावावेळी सोनिया गांधी यांनी भाषण केले होते. 2018 च्या अविश्वास प्रस्तावावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण केले होते.. पण यावेळी सर्वात मोठ्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना भाषण करू दिले नाही. त्यामुळे त्यांचा काँग्रेसने अपमान केला, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी अधीर रंजन यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा -
- PM Narendra Modi on Manipur : मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास
- PM Modi On Opposition : 'देश आपल्याबरोबर आहे' मणिपूरवासियांना मोदींनी दिला विश्वास, काँग्रेसचे काढले वाभाडे