नवी दिल्ली -युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण ( Medical Internship in india ) करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. देशाची वैद्यकीय नियामक संस्था नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) एक परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. रशिया-युक्रेन युद्धपरिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असलेल्या तणावाला पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे नॅशनल मेडिकल कमिशनने म्हटलं आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत आपले शिक्षण सोडून अनेक विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले आहे. या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी NMC ने हे पाऊल उचलले आहे. युक्रेन आणि रशियातील युद्धस्थितीमुळे यासारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव, गुणवत्ता आणि भारतात परतल्यावर काम करण्यासाठी पात्र ठरण्याची क्षमता असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. युक्रेनमधील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.
रशियाकडून युक्रेनच्या दोन शहरांमध्ये तात्पुरता युद्धविराम -
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू आहे. दिवसेंदिवस रशिया आधिक आक्रमक होत असल्याचे दिसून येत होते. रशियाने युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यात अनेक सामान्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर संपूर्ण जगभरातून रशियावर टीका होत आहे. यातच रशियाने आज तात्पुरती युद्धबंदीची घोषणा ( Russia declares ceasefire in Ukraine ) केली. सामान्य नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी कॉरडॉर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.