पाटणा -बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. निवडणुकीत जास्त जागा जिंकूनही भाजपाने जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यातच नितीश कुमार यांना भाजपाने तात्पुरते मुख्यमंत्री केल्याचा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी केला आहे. भाजपाने आपल्या आमदारांना पुढील 3 ते 4 महिने शांत राहण्यास सांगितले असून भाजपा बिहारमध्ये ऑपरेशन लोटस रावबणार आहे. मात्र, हे ऑपरेशन कर्नाटक किंवा मध्यप्रदेशपेक्षा वेगळे असेल, असे झा यांनी सांगितले.
बिहारमध्ये, मध्यप्रदेश/कर्नाटकपेक्षा थोडे वेगळे ऑपरेशन लोटस चालवण्यात येणार आहे. भाजपाने आपल्या आमदारांना 4 महिन्यांसाठी शांत राहण्यास सांगितले आहे. ज्यांना अस्थायी स्वरुपात पद मिळाले आहे, हे त्यांच्याही लक्षात येत आहे, असे टि्वट मनोज झा यांनी केले आहे. नितीश कुमार यांनी मोठी चूक केली आहे. मात्र, जनादेश लक्षात घेऊन जर ते पश्चताप करण्यास तयार असतील. तर त्यांच्यासाठी इतर दरवाजे खुले आहेत, असे मनोज झा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.