नवी दिल्ली Nitin Gadkari on Tax on Diesel vehicles: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंगळवारी म्हणाले होते की, 'डिझेलवर चालणारी वाहनं आणि जनरेटरचा वापर जास्त होत राहिला तर प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल इंजिन वर १० टक्के अतिरिक्त कर लावला जाईल. यासाठी मी अर्थमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले होते. 'डिझेलला गुडबाय म्हणा. कृपया ते वापरणं बंद करा. अन्यथा आम्ही इतका कर वाढवू की डिझेल गाड्या विकणं कठीण होईल, असं गडकरी म्हणाले होते. यानंतर डिझेल वाहनांवर १० टक्के जीएसटी लावण्याच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या.
नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण : आता यावर स्वत: गडकरींनी स्पष्टीकरण दिलंय. 'सरकारकडे सध्या डिझेल वाहनांवर १० टक्के अतिरिक्त कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही', असं नितीन गडकरी यांनी 'X' वर पोस्ट करत सांगितलं. 'माध्यमांच्या बातम्यांमध्ये असं म्हटलं जात आहे की, डिझेल वाहनांवर अतिरिक्त १० टक्के जीएसटी लावला जाईल. यावर मी हे स्पष्ट करू इच्छितो की असा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारसमोर विचाराधीन नाही, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
२०७० पर्यंत कार्बन नेट झिरो गाठण्यासाठी तसेच डिझेल सारख्या घातक इंधनामुळे होणारं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ आणि हरित पर्यायी इंधनाचा अवलंब करणं गरजेचं आहे. ही इंधने किफायतशीर, स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त असावीत-केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी