लंडन -पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदीला जोरदार धक्का बसला आहे. नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पणासंदर्भात दोन वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर आज लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने निर्णय दिला आहे. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय नीरव मोदीकडे आहे.
नीरव मोदीने साक्षीदारांना धमकावले असून पुरावे नष्ट करण्यासाठी कट रचल्याचे न्यायालयाने म्हटलं. निरव मोदीसाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बराक नंबर 12 योग्य असून वैद्यकीय आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे वेस्टमिन्स्टर न्यायमूर्तीने म्हटलं. तसेच नीरव मोदीविरोधात भारतात गुन्हा दाखल असून त्यासाठी त्याला भारतीय न्यायालयात हजर होणे गरजेचे आहे, असेही न्यायामूर्तींनी नमूद केले. नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तरुंगात कैद आहे.
निरव मोदीला कारागृहात 'या' मिळणार सुविधा-
आर्थर कारागृहातील बराक नंबर 12 ही सर्वाधिक सुरक्षित कोठडी असून या कोठडीत पुरेसा सूर्य प्रकाश, हवा आणि शुद्ध पाण्याची सोय करून देण्यात आली आहे. निरव मोदी याला कारागृहात ठेवल्यास त्याच्या मागणीनुसार लाकडी पलंग देण्यात येणार आहे. मोदीला त्याच्या मागणीनुसार दिवसभरात 1 तासाहून अधिक वेळ कोठडी बाहेर येऊन व्यायाम करण्यासाठी परवानगीसुद्धा देण्यात येणार आहे. आर्थर रोड कारागृहातील 12 नंबरची बराक हा सीसीटीव्हीच्या देखरेखीत आहे. यामुळे हा बराक सुरक्षित समजला जाते.