कोझिकोड Nipah virus : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात दोन जणांच्या अनैसर्गिक मृत्यूनं खळबळ उडाली होती. निपाह व्हायरसमुळं हे मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याची पुष्टी केली आहे. पुण्याच्या नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट येथे झालेल्या चाचणीत या दोघांना निपाह व्हायरसचा संसर्ग झाल्याचं उघडकीस आलंय.
- केंद्रीय पथक केरळला पाठवलं जाईल : या प्रकरणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक केरळला पाठवलं जाईल, असं केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. केंद्र सरकार केरळ सरकारला निपाह व्हायरस व्यवस्थापनात सर्वतोपरी मदत करेल, असं ते म्हणाले.
३० ऑगस्ट रोजी पहिला मृत्यू : केरळच्या कोझिकोडं येथं ३० ऑगस्ट रोजी पहिल्या संशयिताचा मृत्यू झाला होता. त्यानं २७ तारखेला कोझिकोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्याच्या नमुन्याची चाचणी होऊ शकली नाही. ज्या दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो या रुग्णाला भेटण्यास दवाखान्यात आला होता. त्यानंतर त्याचाही मृत्यू झाला. या ४० वर्षीय तरुणावर चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
मृतांच्या नातेवाईकांची प्रकृती बिघडली :या दोन्ही मृतांमध्ये निपाह आजाराची लक्षणं आढळून आल्यानं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी शरीरातील द्रव तपासणीसाठी पाठवलं. त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. आरोग्य विभागानं दोन्ही मृत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ७५ व्यक्तींची यादी गोळा केली आहे. पहिला मृत ४९ वर्षांचा असून त्याची ५ व ९ वर्षांची दोन मुलं, त्याचे नातेवाईक, २२ वर्षीय युवक व नऊ महिन्यांचं बाळ सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ९ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर असून तो व्हेंटिलेटरवर आहे.
२०१८ मध्ये पहिल्या प्रकरणाची पुष्टी : केरळमध्ये मे २०१८ ला पहिल्या निपाह प्रकरणाची पुष्टी झाली होती. आत्तापर्यंत या आजारानं १८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये, एका १२ वर्षांच्या मुलाचा निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. मात्र सध्या तरी घाबरण्याचं कारण नाही, असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. असं असलं तरी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलाय.
हेही वाचा :
- Nipah Alert In Kozhikode : केरळमध्ये निपाह विषाणूचा हाहाकार; दोन संशयित मृत्यू झाल्यानं आरोग्य विभागानं जारी केली 'अॅडव्हायझरी'
- केरळमध्ये 12 वर्षीय मुलाचा निपाह विषाणुच्या संसर्गाने मृत्यू