नवी दिल्ली Nipah Virus In Kerala : केरळमधील निपाह विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी, केरळमधील कोझिकोडमध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचा पुण्यातील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV) येथे आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली या परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण करून महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितलंय.
व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी उपाययोजना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार या परिस्थितीवर दक्षतेने लक्ष ठेवून आहे. या व्हायरसचा आणखी प्रसार होऊ नये यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचं डॉ. भारती पवार यांनी आढावा घेतल्यानंतर सांगितलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR-NIV यांच्या संयुक्त प्रयत्नांवर त्यांनी सांगितले की, बायोसेफ्टी लेव्हल 3 (BSL-3) प्रयोगशाळांसह सुसज्ज मोबाइल युनिट्ससह उच्च-स्तरीय टीम्स ऑन-ग्राउंड चाचणीसाठी कोझिकोड येथे पाठवण्यात आल्या आहेत. तसेच कोझिकोड भागातील बाधित ग्रामपंचायतींना क्वारंटाइन झोन म्हणून नियुक्त करण्याची घोषणाही भारती पवारांनी केलीय. या उद्रेकाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य उपायांची अंमलबजावणी करण्यात राज्याला मदत करण्यासाठी डॉ. माला छाबरा यांच्या नेतृत्वाखालील एक बहु-अनुशासनात्मक चमूंची टीमही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तैनात केलीय. या विषाणूचा प्रादुर्भाव प्रभावीपणे हाताळण्यासाठी सर्व आवश्यक संसाधने आणि मदतीची व्यवस्था करण्यासाठी केंद्र परिश्रमपूर्वक काम करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR-NIV दररोज परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असंही डॉ. पवार यांनी सांगितलंय.