जीप दरीत कोसळल्याने नऊ मजूर महिला ठार वायनाड (केरळ) : येथे एक भीषण अपघात झाला आहे. यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व महिला आहेत. या सर्व मजूर महिला वायनाड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्व महिला चहाच्या मळ्यातून काम करून घरी जात असताना हा अपघात झाला.
खोल दरीत कोसळली : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीप अनियंत्रित होऊन सुमारे २५ मीटर खोल दरीत पडली. अपघातात बळी ठरलेली जीप मजुरांना घेऊन जात होती. केएल ११ बी ५६५५ क्रमांकाची जीप मजुरांनी खचाखच भरलेली होती. त्याचवेळी हा अपघात झाला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तर या घटनेत ४ जण जखमी झाले आहेत.
७ महिलांची ओळख पटली :या एकूण ९ मृत महिलांपैकी ७ महिलांची ओळख पटली आहे. सर्व मृतक कंबामाला, थाविंजल गावच्या रहिवासी होत्या. यापैकी उमा, राणी, संथा, राबिया, चिन्नम्मा, शाजा, लीला या महिलांची ओळख पटली आहे. या अपघातात जीपचा चालक मणी हा गंभीर जखमी झाला आहे.
जीपमध्ये चालकासह १३ जण :अपघात झाला त्यावेळी जीपमध्ये चालकासह १३ जण होते. दोन गंभीर जखमींना वाचवण्यात आलं असून त्यांना मानंतवाडी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून कन्नोथ माळाजवळ हा अपघात झाला.
डोंगराळ भागात अपघात : गावकऱ्यांना या घटनेची महिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना मुख्य रस्त्यावर नेण्यासाठी गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अपघातस्थळ डोंगराळ भागाने वेढलेलं असून सर्व जखमी, मृतांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. एकाच गावातील महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.