कांचीपुरम (तामिळनाडू) :तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कांचीपुरममध्ये एका कारखान्याला लागलेल्या आगीत 9 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ओरिका कांचीपुरमच्या शेजारी असलेल्या कुरुविमलाई वालालथोट्टम भागात नरेंद्रन फायर वर्क्स नावाचा फटाका निर्मिती कारखाना 20 वर्षांहून अधिक काळापासून आहे. फटाक्यांच्या कारखान्यात विविध प्रकारचे फटाके तयार केले जातात. आज या गोडाऊनमध्ये 30 हून अधिक लोक नेहमीप्रमाणे काम करत होते. याचदरम्यान फटाक्यांच्या या गोदामात अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. त्यानंतर कांचीपुरम अग्निशमन विभाग आणि पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आणि पीडितांना वाचवण्यासाठी तत्काळ मदत कार्य केले सुरू केले. मात्र तोपर्यंत दोन महिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला होता.
नऊ जणांचा मृत्यू :फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत सुरूवातीला 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. आतापर्यंत 10 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना कांचीपुरम जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या उपचाराविना आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 4 जण गंभीर जखमी आहेत. या स्फोटात आतापर्यंत 2 महिलांसह 9 जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे. स्फोटाच्या दुर्घटनेप्रकरणी मगरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्फोटाच्या कारणाचा तपासाला सुरूवात झाली आहे.