नवी दिल्ली:निक्की यादव हत्याकांड तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. साहिल आणि निक्की आधीच विवाहित होते, हे लग्न ऑक्टोबर 2020 मध्ये नोएडातील एका मंदिरात झाले होते. विवाहासंबंधीचे दाखलेही पोलिसांना मिळाले आहेत. साहिलचे कुटुंबीय मात्र या लग्नावर खूश नव्हते. त्यांनी बळजबरीने डिसेंबर २०२२ मध्ये साहिलचे लग्न निश्चित केले आणि हे मुलीच्या घरच्यांपासून लपवून ठेवले.
साहिलच्या वडिलांसह ५ जणांना अटक : निक्की यादव खून प्रकरणातील मुख्य आरोपी साहिलला ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या हत्या प्रकरणाच्या कटावरून पडदा हटवण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आत्तापर्यंतच्या तपासात असे आढळून आले आहे की, साहिलनेच निक्कीची हत्या केली होती पण तसे नव्हते. तपास करत असताना, या हत्येच्या कटात इतर लोकांचाही सहभाग असल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. यामध्ये साहिलचे वडील बिरेंद्र गेहलोत यांचेही नाव समोर आले आहे. गुन्हे शाखेने साहिलच्या वडिलांसह एकूण ५ जणांना अटक केली असून, चौकशीदरम्यान साहिलला निकीच्या हत्येची माहिती असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साहिलच्या वडिलांशिवाय साहिलचे काही नातेवाईक आणि मित्रही या कटात सहभागी आहेत.
साहिलच्या कुटुंबीयांचीही चौकशी पोलिसांकडून सुरु:दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केलेल्या लोकांमध्ये आरोपीचे वडील वीरेंद्र गेहलोत, भाऊ आशिष आणि नवीन, मित्र लोकेश आणि अमर यांचा समावेश आहे. यामध्ये नवीन हा दिल्ली पोलिसात हवालदार पदावर कार्यरत असून, मिळालेल्या माहितीनुसार तो साहिलचा चुलत भाऊ आहे. या हत्येशी संबंधित गुपिते उघड करण्यासाठी पोलीस आता त्यांची सतत चौकशी करत आहेत.