नवी दिल्ली/ठाणेNIA raids today - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयएने) दहशतवाद्यांकडून घातपात होण्याच्या शक्यतेनं मोठी कारवाई केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ४४ ठिकाणी छापे टाकले आहेत. भिवंडीतही एनआयएकडून कारवाई सुरू आहे. शहरातील तीनबत्ती, शांतीनगर आणि इस्लामपूरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर महाराष्ट्रातील कारवाईत एकूण 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.
- एनआयनं संशयितांना ताब्यात घेतलं आहे. शाकिब नाचन, हासिब मुल्ला , मुसाब मुल्ला , रेहान सुसे , फरहान सूसे , फिरोझ कुवार , आदिल खोत , मुखलिस नाचन , सैफ आतिक नाचन ,याह्या खोत राफिल नाचन, राझील नाचन , शकूब दिवकर , कासीफ बेलारे आणि मुंझिर केपी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
- एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथकानं सकाळी ८.३० च्या सुमारास मिरा भाईंदर परिसरात छापा टाकला. यामध्ये एका व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. मिरारोडच्या नया नगर भागात ही छापेमारी करण्यात आली. एनआयएनं संशयित व्यक्तीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
कोंढव्यातून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त-पुण्यातील कोंढवा येथील तालाब फॅक्टरी इथे इसेन्शिया सोसायटीमध्ये शोएब अली शेख यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. यात एनआयएकडून लॅपटॅाप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तर पुण्याच्या मध्यवस्ती ठिकाण असलेल्या मोमीनपुरा येथील गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अली यांच्या घरी केलेल्या छापेमारीत मोबाईल लॅपटॅाप आणि एक सत्तूर जप्त करण्यात आलं आहे. २०२३ मध्ये एनआयएनं दाखल केलेल्या इसिस संबंधांतील प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं ही छापेमारी करण्यात आली.
तरुणांची दहशतवादी गटात भरती-अल-कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांकडून देशात कट्टर विचारसरणीला प्रोत्साहन देत हिंसाचार घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा एनआयएला संशय आहे. दहशतवादी संघटनांनी देशात इस्लामिक सत्ता स्थापन करण्यासाठी धार्मिक वर्ग आयोजित केले होते. त्यामध्ये तरुणांच्या मनात विष पेरत दहशतवादी गटात भरती केले होते. त्यानंतर एनआयएकडून छाप्यांचं सत्र सातत्यानं सुरू आहे. एनआयएनं भिवंडीच्या पडघा गावात मोठी कारवाई करत महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं एनआयएनं ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतलं आहे. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती.