नवी दिल्ली - फादर स्टॅन स्वामी यांच्या प्रकृतीसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) रविवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. फादर स्टॅन स्वामी यांना तुरूंगात योग्य वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळावेत, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे एनएचआरसीने रविवारी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या नोटीसीत म्हटलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी स्वामींना अटक करण्यात आली होती.
फादर स्टॅन स्वामी 84 वर्षाचे आहेत. एनएचआरसीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना एक नोटीस बजावली आहे. फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शक्य तेवढे प्रयत्न करावेत, असे एनएचआरसीने जारी केलेल्या नोटीसीत म्हटले आहे. स्टॅन स्वामी यांच्या मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करावे, असेही एनएचआरसीने नमुद केले आहे. तसेच नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात असलेल्या स्टॅन स्वामींच्या प्रकृती आणि उपचारासंबंधित अहवालही आयोगाने मागविला आहे.
कोरोनाच्या संक्रमणादरम्यान स्वामींना वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या नसल्याची तक्रार 16 मेला एनएचआरसीला प्राप्त झाली होती. तसेच स्वामींना अद्याप कोरोना लस दिली नसल्याचेही तक्रारीत म्हटलं होते.