मुंबई -सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. सरन्यायाधीशांपुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. राज्यातील 16 अपात्र आमदारांविरोधात आज सुनावणी झाली. सुनावणी संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने सात जणांच्या खंडपीठाकडे प्रकरण नेण्याची मागणी केली होती. त्याचवेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध सुरू आहे. त्याबाबतही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे शिंदे गटाचे अनेक आमदार अस्वस्थ असल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन दिसून येत आहे.
महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा पेच खूप मोठा होता. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बसणार असाच सगळ्यांचा अंदाज होता. एवढेच नाही तर त्याची खात्री सर्व आमदारांच्यासह भाजप आणि शिंदे गटातील सर्वांना होती. मात्र ऐनवेळी असे काही घडले की राज्याची मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गळ्यात पडली. त्यावेळी भाजप शिंदे सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असेही ठरल्याचे माध्यमांना सांगण्यात आले होते. त्यामुळे जवळ-जवळ सर्वच शिंदे गटाचे आमदार मंत्री होणार अशा चर्चा होत्या.
प्रत्यक्ष मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्याचा कारभार सुरू झाला. ज्यावेळी भाजपही सरकारमध्ये सामिल होणार असे निश्चित झाले, त्यावेळी शिंदे गटातील मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या आमदारांची चलबिचल वाढली. आता सगळ्यांनाच मंत्रिपद मिळणार नाही हे निश्चित झाले होते. मग मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर काहीजण पुन्हा ठाकरे गटात सामिल होतील अशी अटकळ बांधण्यात आली. मात्र तसे अजूनपर्यंत झाले नाही. कारण पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही.