- संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. यात कोरोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ या सारख्या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सरकार अनेक विधेयके मंजूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल.
- मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे, कोकण विभाग आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. किनारपट्टीवरिल कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाने दाणादाण उडवली आहे.
- आषाढी वारीसाठी संताच्या पालख्यांचा आज पंढरीत मुक्काम
आषाढी वारीसाठी मानाच्या १० पालख्या विशेष एसटी बसमधून आज दुपारी पंढरपुराजवळील वाखरी येथे दाखल होणार आहेत. वाखरी येथे संत भेट झाल्यानंतर पुढे मोजक्या भाविकांसह पायी चालत पालख्या पंढरीत विसावणार आहेत. दरम्यान, २० जुलै रोजी एकादशी सोहळा आहे.
- राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या तीन दिवसात पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकांची तयारी या संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.
- मंत्री शंभूराज देसाई वाशिम दौऱ्यावर
राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय आढावा बैठक व विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे.
- कर्नाटकमध्ये आजपासून चित्रपट गृहे, मल्टीप्लेक्स उघडणार
कर्नाटक सरकारने आजपासून चित्रपट गृहे, मल्टीप्लेक्स, थिएटर प्रेक्षकांच्या 50% क्षमतेने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु यात कोरोनाच्या आदर्श नियमावली सक्त पालन करावे, असे निर्देश दिले आहेत.
- हरियाणामध्ये आजपासून लॉकडाऊन
हरियाणा सरकारने कोरोनाचा वाढता प्रसार पाहून राज्यात एक आठवड्याचा लॉकडाऊन वाढवला आहे. हा लॉकडाऊन १९ ते २६ जुलै या दरम्यान असणार आहे.
- दक्षिण आफ्रिका-आर्यलंड टी-२० सामना
दक्षिण आफ्रिका आणि आर्यलंड यांच्यात आजपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. उभय संघात आज पहिला टी-२० सामना डूबलिन येथे खेळला जाणार आहे.
- हर्षा भोगले यांचा आज वाढदिवस
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचा आज वाढदिवस आहे. हर्षा यांचा जन्म १९ जुलै १९६१ रोजी हैद्राबादमधील एका मराठी कुटुंबामध्ये झाला. हर्षा हे उत्तम मराठी बोलतात. यूट्यूबवर त्यांचे अनेक मराठी व्हिडिओ उपलब्ध आहेत.