मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात ते महापूर तसेच भूस्खलानामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून बाधितांच्या छावणीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बाधितांना मदतीचे वाटप करून महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
कारगिल युद्धाला आज 22 वर्षे पूर्ण होत असताना वीर जवानांचे स्मरण केले जात आहे. कारगीलच्या युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारताला विजय मिळाला होता. या स्मरणार्थ दर वर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिलमधील मोठ-मोठ्या शिखरांवर पाकिस्तानी घुसखोरांनी ताबा मिळवला होता. यानंतर भारताने 'ऑपरेशन विजय' आखून या घुसखोरांना येथून पिटाळून लावले होते. तब्बल 80 दिवस चाललेले हे ऑपरेशन विजय भारताच्या विजयानंतर संपले.
सोमवारी देशभरात २२ वा कारगिल विजय साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे द्रासला भेट देणार आहेत. सर्वोच्च त्याग आणि शौर्य दाखविणाऱ्या शहीद जवानांना कारगिल युद्ध स्मारक येथे अभिवादन करणार आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न व शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने पत्रव्यवहार केला होता. मात्र दोन वर्षात प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे 26 जुलैला दुपारी 3 ते 5 या कालावधीत शिक्षक समितीने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय महिला हॉकी संघाचा 26 जुलैला जर्मनी संघासोबत सामना होणार आहे.