चंदिगड ( हरियाणा )-रविवारी (दि. 30 जानेवारी) भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदार संघाच्या झाडीली गावात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलेली 19 दिवासांची मुलगी अचानक श्वास घेऊ लागली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबियांनी तिच्या ( Newborn Baby Alive ) अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबिय रुग्णालयातून मुलीला गावाकडे नेत होते. त्यावेळी वाटेतच ती मुलगी श्वास घेऊ लागली. यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती आली.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगड जिल्ह्याच्या एका खासगी रुग्णालयात त्या मुलीचा जन्म झाला. जन्माच्या दुसऱ्या दिवशीच मुलीची तब्येत बिघडली. काही दिवसांच्या उपचारानंतरही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. त्यानंतर तिला महेंद्रगड व भिवानी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तरी तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला हिसार येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी काही वेळानंतर तिला मृत घोषित केले.