नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता करण्यात येणार आहेत. नव्या मंत्रीमंडळात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वांत तरुण नेत्यांचा समावेश असलेले हे कॅबिनेट असणार आहे. नेत्यांचे सरासरी वय सर्वात कमी आणि शैक्षणिक पात्रता सर्वाधिक जास्त असेल, अशी माहिती आहे. यात पीएचडी, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट नेत्यांचा समावेश असणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपामधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. चर्चेत असलेले बरेच नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, पशुपती पारस, नारायण राणे आणि वरुण गांधी यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशन आगोदर करण्यात येत आहे. देशांमध्ये असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा थांबवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार पुढच्या वर्षी होणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात असल्याचं बोललं जात आहे