नवी दिल्ली :देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच, आता नव्या स्ट्रेनने डोके वर काढले आहे. संपूर्ण देशभरात आतापर्यंत नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झाल्याचे ७३ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी आठ रुग्ण दिल्लीमध्ये आहेत. तसेच, आणखी काही संशयितांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
दिल्लीत कोरोना नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण; ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याचे आवाहन दिल्लीतील एकूण रुग्णसंख्या आठवर..
तीन दिवसांपूर्वी एकूण १५ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यांमधील चौघांना या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाचे एमडी डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले, की यापूर्वी चार जणांना याची लागण झाली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या चार रुग्णांनंतर दिल्लीतील एकूण नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. तसेच, अद्याप काही रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.
दोन दिवसात मिळतील इतरांचे अहवाल..
डॉ. कुमार यांनी सांगितले, की अजूनही १५ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. येत्या दोन दिवसांमध्ये या सर्वांचे अहवाल स्पष्ट होतील. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या दिल्लीमधील सर्व रुग्णांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, ब्रिटनहून आलेल्या सर्व संशयितांनाही येथेच दाखल करण्यात येत आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्ण आणि ५१ संशयित दाखल आहेत.
ब्रिटनहून येणारी विमाने थांबवण्याची मागणी..
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील कित्येक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद केली होती. आजपासून भारत सरकारने ही बंदी हटवली आहे. सरकारच्या या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील गंभीर परिस्थिती पाहता, ही बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवावी असे आवाहन केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केले आहे.
हेही वाचा :बर्ड फ्लू : पोल्ट्री व्यावसायिकांना केरळ सरकार देणार नुकसानभरपाई