नवी दिल्ली:विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत, त्यांना आता दोनदा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आलीय. त्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होतील. दोनदा परीक्षा द्यावी लागेल, असं म्हटल्यानंतर अनेकांच्या घशाला कोरड सुटली असेल.
विद्यार्थ्यांचा फायदा : पुढील शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतलाय. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी घेण्यात आलाय. या निर्णयामुळे देशातील 10वी- 12वी बोर्डाच्या परीक्षा अधिक सुलभ होतील. एका वर्षात होणाऱ्या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाईल. शिवाय अभ्यास पूर्ण झालेल्या विषयांचाच फक्त पेपर देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना असेल. तसेच इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणे आवश्यक असेल. त्या दोन भाषांपैकी किमान एक भाषा भारतीय असणे अनिवार्य असेल.