काठमांडू - शेजारील देशांमध्ये भाजपाच्या विस्ताराबाबतच्या अमित शाह यांच्या कथित वक्तव्यावरून नेपाळने नाराजी व्यक्त केली आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, नेपाळचे भारतातील राजदूत नीलांबर आचार्य यांनी संबंधित वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त करणे आणि स्पष्टीकरणासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात नेपाळ आणि भूतानचे संयुक्त सचिव आणि प्रभारी अरिंदम बागची यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.
विशेष योजना
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी दावा केला होता, की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पक्षविस्तार करायचा आहे. त्यादृष्टीकोनातून नेपाळ आणि श्रीलंकेत सरकार बनविण्यासंदर्भात योजना आखली जात आहे.
पक्षाचा विस्तार करण्याचा विचार
नेपाळने यासंदर्भात आपली नाराजी उघड केल्यानंतर भाजपाने आश्वासन दिले आहे, की बिप्लब देब यांच्या वक्तव्यप्रकरणी पक्षाच्या बैठकीत चर्चा होईल. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, देब यांनी म्हटले होते की शाह त्रिपुराच्या दौऱ्यावर असताना पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात देशाच्या बहुतांशी राज्यांत भाजपाचे सरकार आहे. आता शेजारील देशांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा विचार आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून दखल
देब यांच्या यांच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. त्यात नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीपकुमार ग्यावली यांनी वरिष्ट पातळीवर दखल घेत नाराजी व्यक्त केली.