नवी दिल्ली :भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून देशातील अनेक शहरे, वास्तू आणि रस्त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. आता दिल्लीतील नेहरू मेमोरियलचे नावही मोदी सरकारने बदलले आहे. नेहरू मेमोरियलचे आता पंतप्रधान संग्रहालय ( Prime Minister Museum And Library ) असे नामकरण करण्यात आले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव एनएमएमएलच्या समितीने 17 जून 2023 ला दिला होता. मात्र 14 ऑगस्ट 2023 पासून हे नाव बदलण्यात आल्याची माहिती संग्रहालयाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
जूनमध्ये घेतला होता नाव बदलण्याचा निर्णय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव 2016 मध्ये ठेवला होता. त्यामुळे एनएमएमएलच्या सोसायटीने जूनमध्ये नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एनएमएमएलच्या सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले नृपेंद्र मिश्रा यांनी याबाबतचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव पदावर कार्यरत होते.
पंडित नेहरुंचे 16 वर्षे या वास्तूत निवास्थान :दिल्लीतील तीन मूर्ती भवन हे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या वास्तूत तब्बल 16 वर्षे वास्तव्य केले होते. त्यानंतर त्यामुळे राष्ट्रपती एस राधाकृष्णन यांच्या हस्ते ही वास्तू नेहरू यांना समर्पित करण्यात आली होती. तेव्हापासून या वास्तूला नेहरू मेमोरियल म्युझियम म्हणून ओळखले जात होते.