लखनऊ -अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी सन्मान निधी ( Prime Minister Kisan Samman Nidhi ) मृत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्याची मोठी बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांतील 46 हजारांहून अधिक मृत शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान सन्मान निधी पाठवण्यात आला आहे. विभागाकडून सोशल ऑडिट करून त्याची पडताळणी केली असता हा मोठा घोटाळा समोर आला आहे. आता योगी सरकारने ( Yogi Government ) तपास आणि वसुलीचे आदेश दिले आहेत.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीअंतर्गत, सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 च्या तीन हप्त्यांमधून दरवर्षी ₹6000 हस्तांतरित करते. उत्तर प्रदेशमध्ये दोन कोटी ५५ लाख ८० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४५ हजार कोटींहून अधिक रक्कम भरण्यात आली आहे. विभागीय स्तरावर मनी ट्रान्सफरचे सोशल ऑडिट केले असता हजारो मृत शेतकऱ्यांच्या खात्यावरही हा निधी जमा झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. राज्यातील अशा सुमारे ४६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आल्याचे ऑडिटमध्ये समोर आले आहे.
अधिकाऱ्यांवर होणार कारवाई - सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत, त्यांच्या अवलंबित किंवा सहकारी खातेदारांशी संपर्क साधून हस्तांतरीत करण्यात आलेली रक्कम वसूली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पडताळणी न करता मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही विभागीय कारवाई करण्यात येणार आहे.