कोटा (राजस्थान) : कोटा शहरातील लँडमार्क परिसरात कोचिंग घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात अभ्यासाच्या ताण - तणावाबाबत लिहिण्यात आले आहे. हा विद्यार्थी 'नीट' परिक्षेच्या तयारीसाठी एका वर्षापूर्वी बिहारमधून कोटा येथे आला होता. नुकतीच त्याने परीक्षाही दिली होती. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. संबंधितांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कुटुंबीय आल्यानंतर शवविच्छेदन आणि इतर प्रक्रिया केली जाईल. या सोबतच विद्यार्थ्याची खोलीही सील करण्यात आली आहे.
विद्यार्थी बिहारचा रहिवासी होता : कुन्हडी पोलिस स्टेशन अधिकारी गंगा सहाय शर्मा यांनी सांगितले की, मृत विद्यार्थ्याचे नाव नवलेश कुमार असून तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. तो गेल्या एका वर्षापासून कोटा येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीत व्यस्त होता. तो भाड्याने खोली घेऊन राहत होता. तेथे राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी तो दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आज त्याच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. त्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात अभ्यासाच्या ताण तणावाबाबत लिहिलेलं आहे.