NCP Crisis Hearing EC : अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडं सादर केलेली प्रतिज्ञापत्रं खोटी; शरद पवार गटाचा दावा
NCP Crisis Hearing EC : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर गुरुवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 नोव्हेंबरला होणार आहे. अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडं सादर केलेली कागदपत्रं खोटी असल्याचा दावा शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केलाय.
नवी दिल्ली NCP Crisis Hearing EC : निवडणूक आयोगासमोर गुरुवारी सुनावणी पार पडली. अर्जदारानं (अजित पवार गट) निवडणूक आयोगासमोर दाखल केलेली 20 हजार प्रतिज्ञापत्रं खोटी आहेत. अजित पवार गटाला कोणताही पाठिंबा नाही. या प्रकरणाचा पुढील युक्तिवाद 20 नोव्हेंबरला होणार आहे. पण, यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आम्ही निवडणूक आयोगाकडं केली आहे, अशी माहिती शरद पवार गटाच्या वकिलांनी दिली. तसेच आयपीसी अंतर्गत गुन्ह्याखाली त्यांना शिक्षा करावी, अशी मागणीही करण्यात आली.
पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला : गुरुवारच्या सुनावणीत आम्ही काही तथ्य निवडणूक आयोगासमोर मांडली आहेत. अजित पवार गटाकडून याआधी निवडणूक आयोगाकडं काही कागदपत्रं सादर करण्यात आली होती. त्यातील २० हजार प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत. तर, ८ हजार ९०० प्रतिज्ञापत्रांचं चार्ट बनवून निवडणूक आयोगात सादर केलंय. त्यामुळं अजित पवार गटानं फसवणूक केली असून, याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे. पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार आहे.
राष्ट्रवादीत बंड अन् सुनावणी : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. यात राष्ट्रवादीच्या अन्य आठ आमदारांचाही समावेश आहे. या बंडानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? यावरुन दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. या प्रकरणावरुन सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष यांच्या कोर्टातही सुरू आहे.
सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हजर : सध्या राष्ट्रवादी पक्षनाव आणि पक्षचिन्हाचा तिढा निवडणूक आयोगात आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा करत निवडणूक आयोगात याचिका केली होती. याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. ९ नोव्हेंबर रोजी शरद पवार गटानं आपली बाजू मांडली. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.