नवी दिल्ली NCP Crisis : निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार होणार आहे. विषेश म्हणजे पुढील तीन दिवस ही सुनावणी पार पडणार आहे. यात निवडणूक आयोग राष्ट्रवादी कोणाची याबाबत दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची? यासंदर्भात निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
शरद पवार गटाचा दावा काय : याआधी 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत आयोगासमोर अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार यांच्या गटाकडून बाजू मांडली होती. यासंदर्भात पुन्हा आजपासून सुनावणी सुरु होणार आहे. तसंच, यापार्श्वभूमीवर दिल्लीत आगामी रणनिती ठरवण्यासाठी शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगासमोर 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला होता. यादरम्यान अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मृत्यू झालेल्या लोकांची प्रतिज्ञापत्रं दिली गेली. तसंच, अल्पवयीन मुलांचीही प्रतिज्ञापत्रं दाखल केल्याचा दावा त्या सुनावणीत अभिषेक मनु सिंघवी यांनी केला होता.
अजित पवार गटानं काय म्हटलं : मागील महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटानं शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद केला होता. अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे निवडणूक आयोगात बाजू मांडणार आहेत. या सुनावणीत अजित पवार गटाकडून पी. ए. संगमा, सादिक अली या दोन्ही केसचा दाखला देण्यात आला होता. तसंच शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगानं देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख वारंवार करण्यात आला होता.
सुनावणीकडं संपुर्ण राज्याचं लक्ष : 2 जुलैला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेप्रमाणंच अजित पवार गटानंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केलाय. अजित पवार गटानं पक्षावर दावा केल्यामुळं शरद पवार गटानंही आक्रमक भूमिका घेतलीय. यामुळं हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेलंय. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबत जो निर्णय दिला, तोच निर्णय राष्ट्रवादीबाबत देणार का? राष्ट्रवादी पक्ष कोणाला मिळणार याकडं संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय.
हेही वाचा :
- राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सोमवारी पुन्हा सुनावणी
- Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांची पुण्यात भेट, भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना
- Sharad Pawar News : सततच्या कार्यक्रमांमुळे शरद पवारांना बैठकीतच वाटू लागले अस्वस्थ, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला