महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 21, 2023, 10:39 PM IST

ETV Bharat / bharat

NCP In Karnataka Polls : कर्नाटक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नऊ उमेदवारांची घोषणा, भाजपच्या माजी आमदारालाही दिले तिकीट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर्षी होणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आज राज्यातील मराठी बहुल भागात 9 उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या उमेदवारांमध्ये भाजपच्या एका माजी आमदाराचाही समावेश आहे.

sharad pawar
शरद पवार

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 9 उमेदवार उभे केले आहेत. पक्षाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. कर्नाटकात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जेडीएस या तीन पक्षांत मुख्य लढत आहे.

हे आहेत उमेदवार : राष्ट्रवादी काँग्रेसने बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या प्रदेशात मराठी भाषिक लोकसंख्येचे प्राबल्य आहे. पाटील यांनी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाविरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. राष्ट्रवादीने देवर हिप्परगीमधून मसूर साहेब बिलागी, जमीर अहमद इनामदार (बसवान बागेवाडी), कुलप्पा चव्हाण (नागठाण), आर हरी (येलबुर्गा), आर शंकर (राणेबेन्नूर), के सुगुणा (हगरीबोम्मनहल्ली), एसवायएम मसूद फौजदार (विराजपेठ) आणि रेणू बानो (नृसिंहराजा) यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या माजी आमदाराला दिली उमेदवारी : हरी हे राष्ट्रवादीच्या कर्नाटक युनिटचे अध्यक्ष आहेत आणि शंकर हे भाजपचे आमदार आहेत, ज्यांनी भाजपकडून निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर पक्ष सोडला होता. 2018 मध्ये राणेबेन्नूर मतदारसंघातून कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी (KPJP) चे एकमेव आमदार म्हणून निवडून आलेले शंकर नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले. मात्र जेव्हा दोन्ही पक्षांच्या काही आमदारांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस - जेडीएस युती सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर ते काँग्रेसचे सदस्य असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. शंकर त्यानंतर भाजपमध्ये दाखल झाले आणि विधान परिषदेवर निवडून आले.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न :गोवा, मेघालय आणि मणिपूर यांसारख्या राज्यांमधील निराशाजनक कामगिरीमुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला. आता तो दर्जा परत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कर्नाटकमध्ये उमेदवार उभे करतो आहे, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने कर्नाटकातील निवडणुकीच्या रिंगणात अशा वेळी प्रवेश केला आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी ऐक्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील प्रचारासाठी राष्ट्रवादीने शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, पीपी मोहम्मद फैजल, फौजिया खान, क्लाईड क्रास्टो आदी स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे.

हेही वाचा :Ajit Pawar Statement : मोठी बातमी! आपणच आताच मुख्यमंत्री होणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details