नवी दिल्ली :एनसीईआरटीच्या नव्या पुस्तकांवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. हा वाद इतिहासाच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे निर्माण झाला आहे. एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकांतून गांधी, आरएसएस आणि गुजरात दंगलीशी संबंधित भाग वगळण्यात आला आहे.
अभ्यासक्रमातून गुजरात दंगलीचा संदर्भ काढला :एनसीईआरटीच्या बारावीच्या पुस्तकात लिहिले होते की, महात्मा गांधींनी हिंदू - मुस्लीम ऐक्याला चालना दिल्याने हिंदू अतिरेकी त्यांच्यावर संतप्त झाले होते. गांधींच्या हत्येनंतर काही दिवस आरएसएसवर बंदी घालण्यात आली होती, असेही यात लिहिण्यात आले होते. पण आता या दोन्ही गोष्टी नव्या पुस्तकातून गायब झाल्या आहेत. हे भाग या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत. तसेच एनसीईआरटीच्या पुस्तकातून गुजरात दंगलीचा संदर्भही काढून टाकण्यात आला आहे. अकरावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात एक प्रकरण आहे, ज्यामध्ये गुजरात दंगलीचा संदर्भ होता. या पुस्तकातून हा परिच्छेद काढून टाकण्यात आला आहे. यासोबतच मुघलांशी संबंधित इतर काही प्रकरणेही अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आली आहेत.
आणीबाणीशी संबंधित प्रकरणे काढली : हे बदल केवळ 12 वीच्या पुस्तकातच झालेले नाहीत, तर 6 वी ते 12 वीच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातूनही काही प्रकरणे काढून टाकण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यानंतर भारतातील राजकारणाशी संबंधीत 'इरा ऑफ वन पार्टी डॉमिनन्स' आणि 'राइज ऑफ पॉप्युलर मुव्हमेंट' हे दोन प्रकरणे काढून टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लोकशाही आणि विविधता, लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयावरील प्रकरणेही काढण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये प्रामुख्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, काँग्रेस, स्वतंत्र पक्ष आणि जनसंघ यांच्याबद्दल सांगण्यात आले होते.
एनसीईआरटीचे स्पष्टीकरण : याबाबत एनसीईआरटीला विचारणा केली असता, राज्य शिक्षण मंडळाकडून अशा मागण्या केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये त्यांनी कोणत्याही जातीचा उल्लेख टाळण्याचा सल्ला दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी संसदेत सांगितले होते की, कोरोनाच्या काळात शिक्षणाचे झालेले नुकसान कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही शिक्षण अधिक तर्कसंगत केले आहे. एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी म्हणाले की, समाज आणि राष्ट्राप्रती आपली एक जबाबदारी आहे, त्यामुळे असे बदल करून आम्ही विद्यार्थ्यांना तणावमुक्त करत आहोत. हा बदल एका विशिष्ट विचारसरणीनुसार करण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांनी साफ फेटाळून लावला आहे. जे काही बदल झाले आहेत, हे सर्व निर्णय गेल्या वेळीच घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा :Modi Yogi Gets Death Threat: पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी.. गुन्हा दाखल