नारायणपूर (छत्तीसगड) Naxalites Kill BJP Leader :छत्तीसगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नक्षली हिंसाचारानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात बराच हिंसाचार झाला होता. निवडणूक प्रचारादरम्यान नक्षलवाद्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू आणि रतन दुबे यांची हत्या केली होती. तर मतदानाच्या दिवशी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला होता.
भाजपा नेत्याची हत्या केली : आता निवडणूक आटोपल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा नक्षली हिंसाचाराचं प्रकरण समोर आलं आहे. यावेळेस नक्षलवाद्यांनी भाजपाच्या एका नेत्याची हत्या केली. नारायणपूरमधील छोटाडोंगर येथील मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या कोमल मांझी या भाजपा नेत्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांकडून दिवसाढवळ्या खुनाची ही तिसरी घटना आहे. या सततच्या हत्यांमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
बेदम मारहाण केली : कोमल मांझी शनिवारी (९ डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास गावात असलेल्या शितळा मंदिरात दर्शनासाठी जात होते. दरम्यान, तीन नक्षलवाद्यांनी त्यांचा मार्ग अडवला आणि त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. नक्षलवाद्यांनी कोमल मांझी यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली. मात्र मांझी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता.
घटनास्थळी चिठ्ठी सोडली : भाजपा नेत्याच्या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सोडली. यात त्यांनी लिहिलं की, "छोटेडोंगर गावातील मुंडटिकारा येथे राहणारा कोमलसिंह प्रसाद हा आमदई खाणीचा दलाल आहे. त्यानं करोडो रुपये खाल्ले. आम्ही त्याला मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. खाण दलाली सरकार आणि साम्राज्यवाद्यांचे एजंट बनू नका, नाहीतर मृत्यू निश्चित आहे. कामगार, दलाल आम्ही तुम्हाला अनेकदा आवाहन करत आहोत, स्वत: ला सुधारा".
हे वाचलंत का :
- छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातही नक्षली हिंसा, आयईडी स्फोटात एक जवान शहीद
- Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, अनेक ठिकाणी नक्षली चकमक