गरियाबंद (छत्तीसगड) Chhattisgarh Naxal Violence : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा संपला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्याप्रमाणे या टप्प्यातही राज्यात नक्षली हिंसाचार झाला.
आयईडी स्फोटात जवान शहीद : राज्यातील गरियाबंदमध्येआयईडी स्फोटात एक आयटीबीपी (ITBP) जवान शहीद झालाय. नक्षलवाद्यांनी मतदानानंतर परतत असलेल्या सुरक्षा दलाला लक्ष्य करून आयईडी स्फोट घडवून आणला. या घटनेत हा जवान जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही नक्षलवादी हिंसाचारात एक जवान शहीद झाला होता.
मतदान अधिकाऱ्यांच्या टीमवर हल्ला : गरियाबंदच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. ही घटना बडे गोबरा गावाजवळ घडली. तेथे एक मतदान अधिकाऱ्यांची टीम सुरक्षा दलाच्या संरक्षणाखाली मतदान करून परतत होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात आयटीबीपीचा जवान हेड कॉन्स्टेबल जोगिंदर सिंग शहीद झाला. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय.