महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चीनबरोबरच्या सीमावादात भारतीय नौदलाचा हिंदी महासागरात दरारा - भारत चीन सीमावाद

हिंदी महासागरात भारतीय नौदलाने कळीची भूमिका निभावत चीनवर दरारा निर्माण केल्याचे व्हाईस अ‌ॅडमीरल ए. के. चावला यांनी सांगितले. नौदल आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचेही ते म्हणाले.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 2, 2020, 7:12 PM IST

कोची - यावर्षी एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. अजूनही हा वाद निवळला नाही. चीनसोबत सीमावाद सुरू झाल्यानंतर लष्कराची तीन्ही दले सतर्क झाली आहेत. हिंदी महासागरात भारतीय नौदलाने कळीची भूमिका निभावत चीनवर दरारा निर्माण केल्याचे व्हाईस अ‌ॅडमीरल ए. के. चावला यांनी सांगितले.

भारतीय नौदलाची सज्जता पाहून चीनने चुकीचे पाऊल उचलले नाही

व्हाईस अ‌ॅडमिरल ए. के चावला हे नौदलाच्या दक्षिण विभागाचे फ्लॅग कमांडींग चिफ ऑफिसर आहेत. चिनी लष्कराने हिंदी महासागरात कोणताही आगळीक करू नये यासाठी भारतीय नौदलाने आपला दरारा निर्माण केला आहे. त्यामुळे चीनने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नाही, असे चावला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जमिनीवर आणि समुद्रातही भारताशी वाद केल्याचे गंभीर परिणाम होतील, असा संदेश चीनपर्यंत गेल्याचे ते म्हणाले.

चीनचा सामना करण्यास नौदल सक्षम

जुलै-ऑगस्टमध्ये दोन्ही देशांतील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे चीनसोबत लढताना भारताची स्थिती गोंधळाची झाली होती का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता चावला यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. चीनचा सामना करण्यासाठी भारत मित्र देशांच्या नौदलाशी सहकार्य करत आहे का? असे विचारले असता चावला म्हणाले, भारत चीनचा सामना करण्यास सक्षम असून कोणीही भारताविरोधी पाऊल उचलेल असे वाटत नाही. भविष्यात नौदलाला आणखी सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

सीमावादानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडले

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात यावर्षीच्या मध्यात धुमश्चक्री झाली. यात २० भारतीय जवान शहीद झाले. तर काहीजण जखमी झाले. या वादानंतर दोन्ही देशांतील वातावरण तापले आहे. राजनैतिक, लष्करी आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर अनेक चर्चा झाल्यानंतरही तोडगा निघाला नाही. चीनने पूर्व लडाखमधील भारतीय भूमीत घुसखोरी केली असून तेथे लष्करी चौक्या उभारल्या आहेत. भारतानेही चीनला प्रत्युत्तर देत काही मोक्याच्या ठिकाणांवर सैन्य तैनात केले आहे. तेव्हापासून भारत-चीन वाद चिघळला असून यावर अद्याप तोडगा निघाला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details