आग्रा (उत्तर प्रदेश) : आग्रा जिल्ह्यातील मालपुरा पोलिस स्टेशन परिसरात गुरुवारी पॅराशूट जंपिंग करताना मोठा अपघात झाला. जागनेर रोडवरील ड्रॉप झोनपासून दीड किमी अंतरावरील गावात पॅराशूट जंपिंग करताना नौदलाचे मार्कोस कमांडो अंकुश शर्मा (26) यांची पॅराशूटची हाय टेंशन वायर अडकली. पॅराशूट अडकल्याने कमांडो अंकुशने पॅराशूटवरून उडी मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
पॅराशूट हाय टेंशन लाइनमध्ये अडकला :रजा घेऊन गावात आलेले लष्कराचे जवान फरान सिंग यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री त्यांना एक पॅराशूट हाय टेंशन लाइनमध्ये अडकलेला दिसला. थोड्या वेळाने त्यातून एक व्यक्ती खाली पडली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर ती व्यक्ती नेव्ही मार्कोस कमांडो होती. जेव्हा हायटेंशन लाइनमध्ये पॅराशूट अडकले तेव्हा शर्मा यांना वाटले की आपण जास्त उंचावर नाही, म्हणून त्यांनी पॅराशूटमधून खाली उडी मारली. मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि खाली पडून ते गंभीर जखमी झाले. काही वेळातच त्यांच्या नाका - तोंडातून रक्त येऊ लागले. दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या सहकारी कमांडोचा कॉल येत होता. त्यामुळे परिसरातील लोकांना अपघाताची माहिती मिळाली.