हैदराबाद :शास्त्रानुसार शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. यावर्षी षष्ठी तिथी 20 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. माता कात्यायनी ही ब्रह्मदेवाची मानसकन्या म्हणूनही ओळखली जाते. देवी कात्यायनीचे रुप सर्वात सुंदर आहे. तिला बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये छठ मैया नावानं देखील ओळखलं जातं. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीच्या अनुष्ठानाने भाविकांना विशेष लाभ होतो. जाणून घ्या देवी कात्यायनीचे रूप, पूजेची पद्धत आणि रंग...
कात्यायनी देवीचं रुप : शास्त्रानुसार देवीचं रूप सोन्यासारखं तेजस्वी असून तिला चार हात आहेत. प्रत्येक हातामध्ये देवीने तलवार, कमळ, अभय मुद्रा आणि वर मुद्रा धारण केली आहे. पौराणिक कथांनुसार, महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्येनंतर देवी कात्यायनी त्यांची कन्या म्हणून जन्माला आली. या रुपात देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून देव आणि मानवांना त्याच्या जाचातून मुक्त केले होते.
देवी कात्यायनीच्या पूजेची पद्धत : नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि ध्यान केल्यानंतर कलश पूजन करा आणि त्यानंतर देवी दुर्गा आणि देवी कात्यायनी यांची पूजा करा. पूजा सुरू करण्यापूर्वी आईचं स्मरण करून हातात फुलं घेऊन संकल्प घ्यावा. यानंतर ती फुले आईला अर्पण करा. त्यानंतर देवीला कुमकुम, अक्षता, फुले इत्यादी सोळा अलंकार अर्पण करावेत. त्यानंतर त्यांना आवडते अन्न अर्पण करा. नंतर पाणी अर्पण करा, तुपाचा दिवा लावावा आणि देवीची आरती करावी. आरतीपूर्वी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पाठ करायला विसरू नका.