वारंगल (तेलंगणा) - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दामोदर राकेश (वय २३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. कुमारस्वामी आणि पूलम्मा असे राकेशच्या आईव-डीलांचे नाव असून तो वारंगल जिल्ह्यातील खानापूरम मंडलातील डबीर पेटा गावातील रहीवाशी होता.
हनुमाकोंडा शहरातील एका महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या राकेशने सहा महिन्यांपूर्वी सैन्य भरतीत शारीरिक चाचणी उत्तीर्ण केली होती. तो लेखी परीक्षेची तयारी करत होता. आर्मी ऑफिसमध्ये काही काम असल्याचे आई-वडिलांना सांगून गुरुवारी संध्याकाळी राकेश हैदराबादला आल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.