भारतात दरवर्षी 24 जानेवारीला 'राष्ट्रीय बालिका दिन' साजरा केला जातो. समाजात समानता आणण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय बालिका दिन सुरू केला. मुलींना जागरूक करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. यासोबतच समाजाच्या जडणघडणीत महिलांचाही तितकाच वाटा आहे, हे लोकांना पटवुन देणे हा देखील या मागचा उद्देश आहे. 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने याची सुरुवात केली होती. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये बालिका वाचवण्यासाठी जनजागृती, बाल लिंग गुणोत्तर आणि मुलींसाठी निरोगी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे, यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1966 मध्ये 24 जानेवारी ला इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. या वर्षी 14 वा राष्ट्रीय बालिका दिन 2023 भारतात साजरा केला जात आहे. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया.
राष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास : 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 'राष्ट्रीय बालिका दिनाचे' आयोजन केले होते. राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा उद्देश मुलींना समाजातील त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, तसेच देशभरातील मुलींना सक्षम करणे हा आहे. या दिवशी मुलींना भेडसावणाऱ्या असमानता आणि त्यांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभरातील मुलींच्या भल्यासाठी काम करण्यासाठी राज्य सरकारे आपापल्या स्तरावर मोहिमा सुरू करतात आणि धोरणे बनवतात. दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राज्य सरकार देखील आपापल्या स्तरावरून जनजागृतीसाठी पुढाकार घेतात.