हैदराबाद : National Engineers Day 2023 देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. अभियंत्यांना राष्ट्राचे निर्माते म्हटलं जातं कारण तेच आपल्या दृष्टीला वास्तव देतात. कोणत्याही प्रकल्पात डिझाईन बनवण्यापासून ते त्याच्या बांधकामापर्यंत अभियंत्यांची मोठी भूमिका असते. अशा अभियंत्यांना सन्मानित करण्यासाठी भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा करण्यासाठी 15 सप्टेंबर ही तारीख का निवडण्यात आली यामागे एक खास कारण आहे.
अभियंता दिवसाचा इतिहास : भारत सरकारनं सर्वप्रथम 1968 मध्ये अभियंता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. एम विश्वेश्वरय्या यांनी समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यांच्या स्मरणार्थ अभियंता दिन साजरा केला जातो. अभियंता दिन हा अभियंत्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. आपल्या देशाच्या, समाजाच्या आणि जगाच्या विकासासाठी अभियांत्रिकी किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करून, आम्ही अभियंत्यांचे आभार मानतो, त्यांच्यामुळंच आपलं जीवन सोपं झालं आहे.
कोण होते एम विश्वेश्वरय्या : एम विश्वेश्वरय्या यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. ते फक्त 12 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. अनेक अडचणींतूनही त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. 1883 मध्ये त्यांनी पूण्यातील सायन्स कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतरच त्यांना सहाय्यक अभियंता पदावर सरकारी नोकरी मिळाली. 1912 ते 1918 पर्यंत त्यांनी म्हैसूरचे 19 वे दिवाण म्हणून काम केलं. एमव्हीने म्हैसूर, कर्नाटकला विकसित आणि समृद्ध प्रदेश बनवण्यात मोठं योगदान दिलं आहे. कृष्णराजसागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर सँडल ऑइल अँड सोप फॅक्टरी, युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूर, बँक ऑफ म्हैसूर आणि इतर अनेक मोठं यश केवळ एमव्हीच्या प्रयत्नांमुळेच शक्य झालं. या कारणास्तव त्यांना कर्नाटकचा भगीरथ असेही म्हणतात.