नवी दिल्ली -दिल्ली हिंसाचार प्रकरणी वर्षभरापेक्षा अधिक काळ तिहार तुरुंगात कैद असलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्या नताशा नरवाल आणि देवांगना कलिता यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विशाल सूर्यकांत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी जामीन न मिळाल्याबद्दल देशातील यूएपीएच्या (बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा) तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशद्रोह आणि व्यवस्थेविरूद्ध बंड करणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. परंतु, सध्याचा कायदा अशा पद्धतीने राबविला जात आहे, ज्यामुळे हा भेद मिटविला जातोय, असे नताशा नरवाल आणि देवांगना कालिता यांनी म्हटलं.
वंचितांचा आवाज उठवणे, देशातील नागरिकांच्या हक्कांबद्दल बोलणे हे देशविरोधी नाही. शिक्षण आणि विचारांसाठीचा संघर्ष या दोन्ही गोष्टी एकत्र जायला हव्यात. सरकारच्या धोरणाविरोधात प्रश्न उपस्थित करणे हा देशद्रोह मानला जाईल. तर कोणत्या समस्येवर तोडगा कसा निघेल, असा सवाल त्यांनी केला.
देशातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कडक कायद्यांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उत्तरात त्या म्हणाल्या, की कठोर कायदे आवश्यक आहेत. परंतु अशा प्रकारच्या तरतुदी तरी होऊ नयेत, ज्यात जामीन मिळणे इतके अवघड होते. कारण, जामीन मिळेपर्यंत तुम्हाला दहशतवादी घोषित केले जाते. यावर काहीच उपाय नाही, असे विद्यार्थी कार्यकर्त्या म्हणाल्या.