पहा काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी वडोदरा (गुजरात) :ज्येष्ठभाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा मोदी विरोध जगजाहीर आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 2024 मध्ये पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न विचारल्यावर स्वामींनी, 'देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला मोदी जबाबदार आहेत. कोरोनामध्ये देशाचा जीडीपी 16 टक्क्यांनी घसरला असून त्यात अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे मोदींनी पुन्हा पंतप्रधान होऊ नये. ते प्रत्येक बाबतीत शून्य ठरले आहेत', असा हल्लाबोल केला.
'मोदींनी परदेश दौऱ्याऐवजी मणिपूरला भेट द्यावी' : वडोदरातील पारुल विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानंतर सुब्रमण्यम स्वामी पत्रकारांशी बोलत होते. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, 'मोदी खूप मनमानी करत आहेत. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे. त्यांनी चीनला मागे टाकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. त्यांनी परदेश दौऱ्याऐवजी मणिपूरला भेट द्यावी', अशी टीका स्वामींनी केली.
'मोदी कोणाला फार काळ जवळ ठेवत नाहीत' : महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण तापले आहे. अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंडखोरी करत भाजप - शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. या प्रकरणी बोलताना 'मोदी हे कोणाला फार काळ जवळ ठेवत नाहीत', अशी टीका केली. राहुल गांधींबाबत ते म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय येईल हे मी सांगू शकत नाही. असे अनेक मुद्दे आहेत जे त्यांनी मांडायला हवेत, मात्र ते बालिश गोष्टीतच अडकून राहतात'. सुब्रमण्यम स्वामी पुढे म्हणाले की, भारत हा जगातील अशा देशांपैकी आहे ज्याने आपल्या संविधानासह कायदेशीर व्यवस्थेत इतिहासात सर्वात जास्त काळ यश संपादन केले आहे.
'संविधान पे चर्चा' महोत्सवात सहभाग : पारुल विद्यापीठाच्या विधी संस्थेने आयआयएमयू सदस्यत्वातून आपल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर संघटना, सार्वजनिक प्रशासन आणि राजकीय घडामोडींच्या वास्तविक गतिशीलतेची माहिती देण्यासाठी 'संविधान पे चर्चा' या दोन दिवसीय कायदेशीर महोत्सवाचे आयोजन केले होते. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
हेही वाचा :
- Narendra Modi : 'काँग्रेस म्हणजे लुटीचे दुकान आणि खोट्याचा बाजार', नरेंद्र मोदींचा घणाघात